अँम्बुलन्स खरेदीसाठी चार हजार कोटींचा घोटाळा, वाढीव आठ हजार कोटींचे टेंडर भ्रष्टाचारासाठी-विजय वड्डेटीवार यांचा गंभीर आरोप..
मुंबई : गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार असलेल्या सरकारी अँम्बुलन्समधून पैसे कमवण्याचे काम सरकारने सुरु केले आहे. राज्यात अँम्बुलन्सचा महाघोटाळा झाला आहे. ४ हजार कोटीमध्ये जे काम होवू शकत होते, त्या कामासाठी ८ हजार कोटीचा खर्च करण्यामागचं कारण काय? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
तसेच यामध्ये आरोग्य खात्यातील एका बड्या मंत्र्याचा हात असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली असून नेमका तो मंत्री आहे तरी कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, राज्यात रुग्णवाहिका महाघोटाळा समोर आले आहे. ‘राज्यात सुरू असलेल्या १०८ अॅम्ब्युलन्सचा तब्बल १० वर्षांसाठी ८ हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले. खरंतर कुठलेही टेंडर ३ वर्षांच्या पलिकडे नसते. या टेंडर याची कुठल्याही पद्धतीने तपासणी केली, तरी हे काम ४ हजार कोटींच्या वर जाऊ शकत नाही.
आरोग्य विभागाच्या मंत्र्याने हे टेंडर तब्बल ८ हजरा कोटींना काढले. मात्र यासाठी नियमाला केराची टोपली दाखवून हे टेंडर ७ दिवसात काढण्यात आले. त्यामुळे या घोट्याळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ४ हजार कोटींच्या कामाला ८ हजार कोटी रुपये मोजणे आणि स्वत:च्या जवळच्या नातेवाईकांना देणे, यामध्ये मंत्र्यांची पार्टनरशिप आहे. त्यामुळे हे राज्य अधोगतीकडे चालले आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार असून संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.