४० मिनिटांचा प्रवास, अखेरच्या क्षणी अनर्थ, पायलटही हतबल, अजित पवारांच्या विमानासोबत नक्की काय घडलं?, महत्वाची माहिती समोर..


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार हे ६६ वर्षांचे होते. राज्याच्या राजकारणात मागील ४० वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता.

अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त त्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या. पण मुंबई ते बारामती हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरला.मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून टेक ऑफ केलं होतं.

हे विमान ४० मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला. पायलटने सुरक्षित लँडींग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं.

विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकाने सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला. लँडिंगदरम्यान विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!