ठाकरेंच्या शिवसेनेचे ४ नगरसेवक निकालापासूनच ‘नॉट रिचेबल’; आता थेट पोलीस ठाण्यात तक्रार….

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निकालापासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार नगरसेवक पक्षाच्या संपर्कात नसल्याने खळबळ उडाली. आता या प्रकरणी थेट कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक नॉट रिचेबल झाले असल्याची तक्रार दाखल केली आहे.नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून निष्पक्ष तपास आणि तातडीच्या शोधमोहीमेची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी चार नगरसेवक सध्या नॉट-रिचेबल आहेत. यातील मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन डोणे हे दोन नगरसेवक 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असल्याने पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अपहरण, दबाव किंवा फसवणुकीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपास करून तातडीने शोधमोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या,असे आवाहन शरद पाटील यांनी केले आहे.
दरम्यान नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांना व्हाट्सअप आणि ईमेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला काही प्रतिसाद या नगरसेवकाकडून आला नाही. त्यांच्या पश्चात पक्षाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांना ही नोटीस बजावली. मात्र त्यांची मोबाईल फोन बंद आहेत. अखेर त्यांच्या मिसिंग असल्याची तक्रार पोलिसांनी देण्यात आली.
