मोठी बातमी! बारामती पोटनिवडणुकीसाठी ३० जणांनी अर्ज नेले; बिनविरोध की रंगणार चुरस? राज्याचं लक्ष केंद्रित…


बारामती : बारामतीत दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने बारामती शहर आणि तालुक्यात आजपासून ‘घोंगडी बैठकां’ना सुरुवात केली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनिती आखली जात आहे.

दरम्यान, या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना अजित पवारांपेक्षा अधिक मतांनी विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली सुरू असतानाच, बारामती पोटनिवडणुकीसाठी तब्बल ३० इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध करण्यावर महायुतीचा भर असल्याचे चित्र सध्या बारामतीत दिसत आहे. मात्र, ३० अर्जांपैकी नेमके किती उमेदवार अर्ज दाखल करतात, किती अर्ज वैध ठरतात आणि शेवटी किती जण माघार घेतात याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे ही निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार कोणत्या संभाव्य उमेदवारांची भेट घेणार, कोणाला समजावणार, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, ६ एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री बारामतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ एप्रिल आहे.

आतापर्यंत तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार बारामतीबाहेरील आहेत. हिंदुस्थान जनता पार्टीकडून सतीश कदम, सागर भिसे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे, तर न्यू राष्ट्रीय समाज पार्टीतर्फे राजू घुटूकडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!