छत्रपतीच्या विद्यमान 21 संचालकांचा पत्ता कट? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा, संचालकांना झाप झाप झापलं, पृथ्वीराज जाचक आणि दादांमध्ये नेमकं काय ठरलं?

भवानीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भवानीनगरमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांशी चर्चा केली. माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सर्वपक्षीय मेळावा आयोजित केला होता. यामध्ये अजित पवार यांनी मागील संचालक मंडळाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, आज मागे वळून पाहिले तर मनाला वेदना होतात. आपण सोमेश्वर माळेगाव कारखान्यासारखा बाजार देत नाही. मी राज्यात असतो मला वेळ नसतो मी जर इथं असतो तर सगळं बोर्ड सुता सारखं सरळ केलं असतं. दहा वर्षांपूर्वी आम्ही सांगितलं द्या निवडून बाजार चांगला देऊ चांगली नोकर भरती करू. पण दहा वर्षात काय झालं नोकर भरतीचा वाटोळ झालं.
कारखान्याला 173 कोटी लॉस आहे. सध्याच्या संचालक मंडळ कोणतं नशीब घेऊन आलेल आहे, यांना दहा वर्षे मिळाली आता माझी विनंती आहे बास, नव्यांना संधी देऊ. संचालकांचे ट्रॅक्टर आहेत लगेच खाली होतात. काही बहाद्दर कामगार सह्या करून निघून जातात काम करत नाहीत अरे काय चाललय काय.
पूर्वजांनी चटणी भाकरी खाऊन कारखाना उभा केला आहे. आम्ही संचालक बॉडी असताना आम्हाला फक्त चहा मिळायचा जेवण आम्ही कधी घेतलं नाही. मी अनेकदा चेअरमन प्रशांत काटे यांना सांगितलं पण तो म्हणायचा दादा माझं कोणी ऐकत नाही. कधी कधी मला वाटायचं आपणच चेअरमन व्हावं.
रानात टॉवर उभे करताना मी रिटायर झाल्यावर माझ्या मुलाला कामाला घ्या, असा करार केला आहे. अख्ख्या दुनियेत असला करार नाही बाकीच्यांनी काय चुना लावून बोंबलायचं का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. छत्रपती बाजार उघडला, मी चेअरमन होतो नीट चालला नंतर त्याची वाट लागली.
नंतर काहीजण प्रमुख नेमले त्यांनी वेलदोडा घे खिशात घाल, बदाम घे खिशात घाल असलं चालू केलं. छत्रपती शिक्षण संस्थेची वाट लावली सगळं नियमाबाह्य केलं आहे. जवळच्या लोकांना चिटकून घेतलं. इंग्लिश मीडियमची अवस्था काय आहे. नाव इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश वाचता येत नाही.
इथल्या पेट्रोल पंपाचे अवस्था काय आहे. आपलं शॉपिंग सेंटर कधी पडेल सांगता येत नाही. मला वाईट वाटतं काय आपण चूक केली हे असं झालं. जाचक बापूंना मी म्हणायचो आपल्यालाही नीट करावं लागेल बापू मला भेटायचे, पण परत मोठ्या नेत्यांना भेटले की गाडी बिघडायची. असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे छत्रपतीची निवडणूक बिनविरोध होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे.