जीबीएसमुळे १४ वर्षांच्या मुलासह २ जणांचा मृत्यू, सांगलीत उडाली खळबळ..

सांगली : जीबीएस आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सांगलीमध्येमधून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जीबीएस लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी (जि. बेळगाव) येथील १४ वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील ६० वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर,सोलापूर, नागपूरनंतर आता सांगलीमध्येही जीबीएसमुळे मृताची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण मृताची संख्या ११ वर पोहचली आहे.
कर्नाटकातील हुक्केरी येथील १४ वर्षांच्या तरुणाला ‘जीबीएस’ची लागण झाली होती. त्याला ३१ जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती.
ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती. तिचा मध्यरात्री मृत्यू झाला. नागरिकांनी घाबरू नये. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी केले आहे.
दरम्यान, माघी यात्रेनंतर पंढरपुरात जीबीएसचे दोन रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही संशयित रूग्ण पंढरपूर शहरातील असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.