आठवणींचे 2 महिने!! ये प्यार, संघर्ष आखिर तक चलता रहेगा, अजितदादांच्या अपघाताला 2 महिने पूर्ण होताच रोहित पवारांचे मोठं वक्तव्य….

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे दोन महिन्यांपूर्वी विमान अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला. तसेच राज्याचे देखील मोठे नुकसान झाले.

अजित पवार हे एक लोकांमध्ये राहणारे तसेच झटपट काम करणारे नेतृत्व म्हणून राज्यभर प्रसिद्ध होते. अनेकांना त्यांनी राजकारणात आणलं. अनेक पदे दिली, आमदार केलं खासदार केलं मात्र कोणाच्याही मनात नसताना दोन महिन्यांपूर्वी विमान अपघातात त्यांचे निधन झाले.
असे असताना या विमान अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केला. अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी देखील अनेकदा पत्रकार परिषद घेऊन तसेच महाराष्ट्र दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या अपघातावर सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अजूनही त्यांनी ही बाजू लावून धरली असून जोपर्यंत अजितदादांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आज अजित पवार यांच्या विमान अपघाताला दोन महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
यामध्ये त्यांनी आठवणींचे २ महिने, ‘ये प्यार और संघर्ष आखिर तक चलता रहेगा’ असं म्हटलं आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वात जास्त जर कोणी याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली असेल तर ते रोहित पवार आहेत. आज त्यांनी केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.