दादांना जाऊन 2 महिने,मन अजूनही त्यांच्या आठवणीमध्ये गुंतलंय, सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज बरोबर दोन महिने झाले. त्यांच्या आठवणीत पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांवर पोस्ट लिहून दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या म्हणाल्या,अजित पवार यांच्या अपघाताला आज बरोबर २ महिने झाले. मात्र दादांची आठवण आल्याशिवाय एक दिवसही जात नाही. त्यांच्या आठवणीत मन अजूनही गुंतून राहिलंय, असे पवार म्हणाल्या.तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली असेही त्या म्हणाल्या.
तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते”, अशी भावनिक पोस्ट राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीत लिहिली आहे.

पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते. दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे, अशी भावनिक आशयाची पोस्ट सुनेत्रा पवार यांनी लिहिली आहे.