नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री (ता.१५) एक मोठी दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. एलएनजेपी रुग्णालयाच्या मुख्य अपघात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेत ३ मुलांसह १८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतर १० जण जखमी झाले आहेत.
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे प्लॅटफॉर्म १४ आणि १५ वर गोंधळ उडाला. ही घटना रात्री ९:५५ च्या सुमारास घडली, त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

खरं तर, प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. प्रवाशांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. यासाठी देशभरातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून लोक तेथे जात आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री (ता.१५ फेबुवारी) नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
अचानक रात्री ८.३० -९ वाजताच्या दरम्यान प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सदर घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे.