थेऊर येथे पकडला १२ किलो गांजा, एकास अटक तर ५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथे दौंड तालुक्यातून गांजा घेऊन निगडी येथे विक्री करण्यासाठी चाललेली रिक्षा लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर रेल्वे पूल सेवा रस्त्यावर रविवारी (२१ सप्टेंबर) रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पकडली आहे. या रिक्षात पोलिसांना सुमारे १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत रिक्षासह गांजा असा एकूण ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक केली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी लक्ष्मण राजू पवार (वय ३०, रा. यमुना नगर मनपा हॉस्पीटलच्या मागे, सिध्दार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्किम निगडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तर रवि आण्णा कुऱ्हाडे ( यमुनानगर मनपा हॉस्पीटलच्या माग सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्किम निगडी, पुणे), चंद्रकांत सुरेश पवार (वय २८, रा. बोरीऐंदी ता. दौंड, जि. पुणे) व एक अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्कारांसह अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एका खबऱ्यामार्फत राहुल कर्डिले यांना थेऊर रेल्वे पुलाच्या जवळ असलेल्या सेवा रस्त्यावरून गांजाची तस्करी होणार आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी ज्ञानेश्वर आंदेकर यांच्या शेतजमीनी लगत पोलिसांनी एक संशयास्पद रिक्षा आढळून आला. पाहणी केली असता रिक्षामध्ये लक्ष्मण पवार व रवि आण्णा कुऱ्हाडे हे होते. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या गोणीची झडती घेतली असता, त्यामध्ये सुमारे २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. यावेळी रवि कुऱ्हाडे हा पोलीस आल्याची चाहूल लागताच रिक्षातून उडी मारून पसार झाला.पोलिसांनी लक्ष्मण पवार याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने सदर गांजा हा चंद्रकांत सुरेश पवार व त्याच्या सोबतच्या दुचाकीवरील अनोळखी इसमाकडून घेऊन विक्रीसाठी चालविला असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून लक्ष्मण पवार याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक मागावर आहे.

सदर कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, अण्णा माने, रामहरी वणवे, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले, प्रवीण धडस, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे व त्यांच्या पथकाने केली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी सार्वजनिक रस्त्यावर खुलेआम गांजा विक्री करणारी महिला मंगल संतोष भाले (वय ४०, लोणी काळभोर ता.हवेली) यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली होती. तिच्याकडून ३ हजार ७०० रुपये किंमतीचा ११० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. भाले यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
