साखरेनंतर गुळानेही दिला ‘गोड’ धक्का! 15 दिवसांत किलोमागे 25 रुपयांची वाढ; सणासुदीत सामान्यांचं बजेट बिघडणार

छत्रपती संभाजीनगर : साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला फटका बसत असतानाच आता गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या किरकोळ बाजारात गुळाचा भाव थेट 80 ते 85 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी हाच गूळ सुमारे 60 रुपये किलो दराने मिळत होता. त्यामुळे कमी कालावधीत किलोमागे तब्बल 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे.
घाऊक बाजारात दहा किलोची गुळाची भेली घेतल्यास ग्राहकांना सध्या 70 ते 75 रुपये किलो दर मोजावा लागत आहे. गुळाच्या दरात अचानक झालेल्या या वाढीमागे बाजारातील पुरवठा, उत्पादन आणि मागणीतील बदल यापैकी नेमका कोणता घटक कारणीभूत आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र ऐन सणासुदीच्या काळात गूळ महागल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या खर्चावर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील साखरेच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळत आहे. उपलब्ध बाजार माहितीनुसार काही ठिकाणी साखरेचा किरकोळ दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. सांगली, बुलढाणा आणि वाशिममध्ये सुमारे 80 रुपये, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये 75 रुपये, तर पुण्यात 72 रुपये किलो दर असल्याची माहिती आहे. मुंबईत काही भागांत 60 ते 65 रुपये किलो, तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुमारे 60 रुपये किलो दर आहे.


साखर आणि गुळाच्या वाढत्या किमतींचा परिणाम मिठाई व्यवसायावरही होण्याची शक्यता आहे. मिठाई तयार करण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने कच्च्या मालाचा खर्च वाढला आहे. परिणामी आगामी सणांच्या काळात मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यता व्यापारी क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यामुळे साखरेनंतर गुळानेही भाव खाल्ल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा आणखी एक भार पडला आहे.