रात्री मुलाचा हात धरून शेताकडे गेला, तासाभरात एकटाच परतला! सात वर्षांच्या चिमुरड्यासोबत काय घडलं?


लातूर : मालमत्तेच्या वाटणीवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद एका निष्पाप चिमुरड्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना लातूरमधील सुळ गल्ली परिसरात उघडकीस आली आहे. दुसऱ्या पत्नीच्या सात वर्षांच्या मुलालाही मालमत्तेत हिस्सा द्यावा, या मागणीवरून पती-पत्नीत वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून वडिलांनी स्वतःच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ५८ वर्षीय युसूफ मुबारक सय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे.

दोन मुलांना वाटा, तिसऱ्या मुलाच्या हिश्श्यावरून वाद

युसूफ सय्यद याला दोन पत्नी असून पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत. संबंधित दोन्ही मुलांना त्याने मालमत्तेतील वाटे दिले होते. मात्र, दुसऱ्या पत्नीचा सात वर्षांचा मुलगा हा तिचा एकुलता एक आधार होता. त्यामुळे आपल्या मुलालाही संपत्तीत योग्य हिस्सा मिळावा, अशी तिची मागणी होती. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे.

५ नोव्हेंबरच्या रात्री बाप मुलाला घेऊन गेला; नंतर एकटाच परतला

५ नोव्हेंबरच्या रात्री युसूफ आपल्या सात वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन घराबाहेर पडला. मात्र, बराच वेळ उलटूनही दोघे घरी परतले नाहीत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या दुसऱ्या पत्नीने पती आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, ७ नोव्हेंबर रोजी युसूफ परभणी शहरात आढळला; मात्र त्याच्यासोबत मुलगा नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

सीसीटीव्हीतील एका दृश्याने संशय बळावला

तपासादरम्यान पोलिसांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात ५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास युसूफ मुलाचा हात धरून घरामागील शेताच्या दिशेने जाताना दिसला. विशेष म्हणजे, साधारण तासाभरानंतर तो त्याच ठिकाणाहून एकटाच परतताना दिसून आला. या दृश्यांमुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि प्रकरणाचा उलगडा झाला.

शेतातील नाल्यात आढळला चिमुरड्याचा मृतदेह

रविवारी दुपारी सुमारे दीड वाजता पोलिसांनी युसूफच्या घरामागील शेतात शोधमोहीम राबवली. त्यावेळी शेतातून वाहणाऱ्या नाल्यात पाण्यामध्ये मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली. मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

मृतदेहाची अवस्था पाहता मुलाची हत्या ५ नोव्हेंबर रोजीच झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मालमत्तेच्या वादातूनच ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील संशयित वडिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे लातूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!