मोठी बातमी! साताऱ्याच्या रेकॉर्डवरील आरोपी लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर


 

 

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात घरफोडी प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. लखन भोसले असे मृत आरोपीचे नाव असून तो अनेक घरफोडी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये होता. ही कारवाई आज (दि. ३० ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजता करण्यात आली. या दरम्यान त्याचा दुसरा एक साथीदार घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे शिक्रापूरजवळ संशयित आरोपी लखन भोसले आणि त्याचा साथीदार या भागात असल्याची टीप मिळाली.

 

दोन दिवसांपूर्वी लखन भोसलेने चाकूचा धाक दाखवून एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी केले होते. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला होता. या प्रकरणानंतर तो फरार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी सातारा पोलिसांचे चार सदस्यीय पथक शिक्रापूर येथे रवाना झाले होते. मात्र अटक करण्याच्या प्रयत्नात आरोपी लखन भोसलेने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस गंभीर जखमी झाले.

 

लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी असून त्याच्यावर सातारा, सांगली, पुणे आणि इतर काही जिल्ह्यांत घरफोडी, दरोडे, चोरी, मारहाण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर शिक्रापूर परिसरात सापळा रचला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शस्त्रासह पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात लखन भोसले जागीच ठार झाला.

 

मात्र त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. लखन भोसले हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता. त्याचा आज झालेला एन्काऊंटर हा सातारा पोलिसांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. या घटनेनंतर शिक्रापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले असून फरार आरोपीलाही लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!