पुणेकरांनो काळजी घ्या! आता ATM मधून पैसे काढतानाही जरा जपून, तरुणासोबत रात्रीच्या अंधारात घडलं भयंकर…

पुणे : एटीएममधून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून दोन चोरट्यांनी त्याच्याकडील २८ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध लूटमार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे
नेमकं घडलं काय?
तक्रारदार तरुण हा कसबा पेठ परिसरात राहतो. १ जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास तो आपल्या एका मित्रासह शिवाजीनगरमधील श्री म्हसोबा मंदिराजवळील एका एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता.

एटीएममधून पैसे काढून जसा तो बाहेर पडला, त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी काहीही विचारण्यापूर्वीच तरुणाला आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तरुण भांबावून गेला.
याचाच फायदा घेत चोरट्यांनी बळजबरीने त्याच्या खिशातील २८ हजार रुपयांची रोकड काढून घेतली आणि दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्याजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध लूटमार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
