‘पहिले 12, मग 9… आता फक्त 4!’ उज्ज्वला लाभार्थ्यांना मोठा धक्का; गॅस सबसिडीवर सरकारची कात्री, घरगुती बजेट कोलमडणार?

मुंबई : महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील (PMUY) कोट्यवधी लाभार्थ्यांना आणखी एक मोठा आर्थिक धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात करण्यात आली असून, वर्षभरात मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ आता केवळ चार सिलिंडरपुरताच मर्यादित राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमध्ये चिंता वाढली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षातील पहिल्या चार एलपीजी रिफिलवरच प्रति सिलिंडर 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा नऊ सिलिंडर होती, तर सुरुवातीला लाभार्थ्यांना तब्बल 12 सिलिंडरवर सबसिडीचा लाभ मिळत होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनुदानाच्या व्याप्तीत सातत्याने घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
या निर्णयामुळे एका लाभार्थी कुटुंबाला वर्षभरात जास्तीत जास्त 1,200 रुपयांचे अनुदान मिळेल. मात्र चार सिलिंडरनंतर लागणारे उर्वरित सर्व सिलिंडर ग्राहकांना पूर्ण बाजारभावाने खरेदी करावे लागतील. त्यामुळे वर्षभरात सात ते दहा सिलिंडर वापरणाऱ्या कुटुंबांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 7 जून रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत 941.50 रुपयांवर पोहोचली आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान मिळाल्यानंतर सिलिंडरची किंमत 641.50 रुपये पडणार असली, तरी हा लाभ फक्त चार वेळाच मिळणार असल्याने अनेक कुटुंबांचे मासिक बजेट विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सरकारकडून मात्र या निर्णयाचे समर्थन करण्यात आले आहे. घरगुती एलपीजीचा पुरवठा खर्च 1,600 रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा करत सरकार अजूनही सामान्य ग्राहकांना सुमारे 700 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांना जवळपास 1,000 रुपयांची अप्रत्यक्ष मदत देत असल्याचे सांगितले जात आहे. सरासरी घरगुती वापराचा विचार करूनच सबसिडीची नवी मर्यादा निश्चित करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोण घेऊ शकतो योजनेचा लाभ?
उज्ज्वला योजनेसाठी अर्जदार महिला असणे बंधनकारक आहे. तिचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असावी. कुटुंबातील कोणाच्याही नावावर अन्य एलपीजी कनेक्शन नसणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
* आधार कार्ड
* रेशन कार्ड
* बँक खाते तपशील
* केवायसी फॉर्म
* पत्त्याचा पुरावा
* कुटुंबातील सज्ञान सदस्यांचे आधार कार्ड
अर्ज कसा कराल?
लाभार्थी उज्ज्वला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच जवळच्या सीएससी केंद्रात किंवा अधिकृत गॅस एजन्सीकडे जाऊनही अर्ज सादर करता येतो.
सबसिडीच्या नियमांतील या मोठ्या बदलामुळे देशभरातील कोट्यवधी उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजीची भावना वाढत असून, वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.